90 150
Download Bookhungama App

विन्स्टन चर्चिल - वि. ग. कानिटकर

Description:

चर्चिल हे साम्राज्यवादी व भारताला स्वातंत्र्य देण्याच्या अखेरपर्यंत विरोधी असले, तरी मूलतः ते लोकशाहीचे उपासक व गुणपूजक होते. त्यांची मते व्रजलेप नसत.विन्स्टन चर्चिल या थोर व्यक्तिमत्वाचे दर्शन या पुस्तकात होते.दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना ‘विन्स्टन चर्चिल’ या माझ्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती सहा वर्षांनंतर प्रसिद्ध होत आहे. चर्चिल यांच्या संबंधात आणखी काही काळ तरी नवी नवी माहिती प्रकाशात येत राहणार आहे. माझ्या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर ‘दी लास्ट लायन’ हे विल्यम मँचेस्टर या लेखकाचे पुस्तक १९८३ मध्ये प्रसिद्ध झाले. सुमारे ८०० पृष्ठांचा हा ग्रंथ आहे. व यात चर्चिल यांच्या जीवनाचा १८९४ ते १९३२ एवढाच कालखंड चित्रित केला आहे. चर्चिल यांचा मुलगा रँडॉल्फ याने वडिलांचे एक प्रचंड चरित्र लिहायला घेतले होते. प्रा. डॉ. मार्टिन गिल्बर्ट हे रँडॉल्फ याचे या चरित्रलेखनात सहकारी होते. चरित्राचे दोन खंड प्रसिद्ध झाल्यानंतर रँडॉल्फ यांचे निधन झाले. डॉ. गिल्बर्ट यांनी हे काम पुढे चालू ठेवले व सुमारे वीस वर्षांच्या परिश्रमानंतर आता आठ खंडांचे संपूर्ण चर्चिल - चरित्र प्रसिद्ध झाले आहे. या खंडाला चर्चिल यांच्या कागदपत्रांच्या तेरा खंडांची जोड आहे. एकाच विषयाचा आयुष्यभराचा ध्यास घेऊन केलेली लेखनाची अशी तपश्चर्या पाहिली की नतमस्तक व्हायला होते. चर्चिल हे साम्राज्यवादी व भारताला स्वातंत्र्य देण्याच्या अखेरपर्यंत विरोधी असले, तरी मूलतः ते लोकशाहीचे उपासक व गुणपूजक होते. त्यांची मते व्रजलेप नसत. एखाद्या विषयात विचार करून मते बदलणे त्यांच्या बाबतीत घडत असे. प्रत्येक राजकीय घटनेविषयी त्यांची पहिली प्रतिक्रिया भावनेच्या आहारी गेलेली व काही वेळा अशोभनीयही असली, तरी कालांतराने घटनेमागील कार्यकारणाभावाची उमज पडून म्हणा किंवा त्यांच्या ठिकाणी जी स्वाभाविक उदारता होती त्यामुळे म्हणा, ते आपली प्रतिक्रिया सौम्य करीत वा पूर्णपणे बदलीत असत. दोन उदाहरणे सहज सांगता येतात. १७ ऑगस्ट १९०९ या दिवशी मदनलाल धिंग्रांना - सावरकरांचे सहकारी क्रांतिकारक - लंडनमध्ये फाशी दिले. त्याने न्यायालयात दिलेले आपल्या कृत्याबाबतचे निवेदन ‘चॅलेंज’ हे ब्रिटिश सरकारने दाबून टाकले होते. लंडनमध्ये असलेल्या स्वा. सावरकरांनी १६ ऑगस्टला ते निवेदन ‘डेली न्यूज’ या ब्रिटिश वृत्तपत्रात व अमेरिकेत जसेच्या तसे प्रसिद्ध केलेे! धिंग्रांच्या निवेदनाची प्रत सावरकरांजवळ कशी हा एक प्रश्न आहे. कदाचित ते सावकरांनीच लिहिले असावे. नव्हे ते सावरकरांनीच लिहिले याचा त्यातील भाषेवरून सहज तर्क करता येतो. काहीही असो. हे निवेदन चर्चिल यांनी वाचले. प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ डब्ल्यू. एस. ब्लंट यांच्याशी बोलताना चर्चिल यांनी - ‘या देशभक्त धैर्यशाली पुरुषाची आठवण दोन हजार वर्षे तरी राहील.’ असे धन्योद्गार काढले असे ब्लंट यांनीच आठवणीत सांगितले आहे. दुसरी आठवण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची आहे. कै. बाळ गंगाधर खेर हे लंडनला भारताचे हायकमिशनर असताना, विन्स्टन चर्चिल पुनः पंतप्रधानपदी आलेले होते. पंडित नेहरू व चर्चिल यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या संबंधी खेरांजवळ बोलताना चर्चिल म्हणाले - ‘या माणसाला भीती ठाऊक नाही आणि द्वेषापासून हा संपूर्ण मुक्त आहे. भारताच्या संसदेत नेहरूंना असलेले मताधिक्य पाहिले की थक्क व्हायला होते. मला जेमतेम तेरा - चौदाचे मताधिक्य आहे.’ चर्चिल यांचे असे अनेक चाहते आहेत, तसेच त्यांचे विरोधकही भरपूर आहेत. अशा या व्यक्तिमत्त्वाचा आलेख समाधानकारक रीतीने काढणे हे प्रत्येक चरित्रकाराला एक आव्हानच राहणार आहे. अधिक अधिक माहिती सतत उपलब्ध होत असल्याने, चर्चिल यांच्यावर मराठीतही नवे नवे लेखक अधिक माहितीपूर्ण लिहितील असा मला विश्वास आहे. माझ्या चर्चिल - चरित्राचे स्वागत करताना ज. द. जोगळेकर, मृणालिनी देसाई, मिलिंद गाडगीळ, श्री. द. सरदेशमुख, भा. म. पागनीस आदी अनेक अभ्यासकांनी विविध नियतकालिकांतून जी परीक्षणे लिहिली, त्यांचा ही आवृत्ती सिद्ध करताना मला उपयोग झाला, हे आभारपूर्वक नमूद केले पाहिजे. शेवटी आभार मानायचे ते प्रकाशक मित्र गजानन क्षीरसागर यांचे. चर्चिल चरित्र सतत वाचले जाईल, अशी त्यांचीच कल्पना असल्याने, त्यांनी मला ते लिहायला सांगितले. आता एक आवृत्ती संपल्यावर नवी काढणे, हे त्यामुळे त्यांनाच करावे लागलेले आहे. वि. ग. कानिटकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि