40.00 100.00
Download Bookhungama App

सृष्टिज्ञान ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१ ८ - विविध लेखक

Description:

सृष्टिज्ञान - दिवाळी अंक -  ध्याससृष्टिज्ञानचा, कास विज्ञानाची, आस समृद्धीची !सृष्टिज्ञानचा हा दिवाळी अंक आपल्या हाती देताना अतिशय आनंद होतो आहे. हा सर्वानुमते निर्मितीचा आनंद मिळविण्यासाठी जुलै - ऑगस्ट महिन्यांमध्येच दिवाळी अंक तयार करण्याचे वेध सुरू होतात. नेहमीच्या मासिक अंकांबरोबरच एकीकडे दिवाळी अंकाची पूर्वतयारी चालू होते.

100 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला दिवाळी अंक हा प्रत्येक मराठी माणसासाठी आपुलकीचा, प्रेमाचा विषय आहे. म्हणून दिवाळी अंकांचं वैभव सातत्यानं जपायला आणि वाढवायला हवे, या भावनेतून दरवर्षी उत्साहानं आणि मनापासून दिवाळी अंकांची निर्मिती होते.

या अंकात आम्ही विषय - वैविध्य ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. जसे की, अवकाशाचा वेध घेतानाच, पृथ्वीतलावरील विस्मयकारक वनस्पती - प्राणी - पक्ष्यांकडेही लक्ष पुरविलं आहे. भारतात नानाविध प्राचीन संस्कृतीच्या खुणा ठळकपणे दिसतात. या संस्कृतीमागील वैज्ञानिक बंध उलगडताना केलेली मीमांसा, त्या त्या अभ्यासाची साक्ष पुरवितात. विज्ञानकथांमधून मानवी मन, स्वभाव आणि भावभावनांची विज्ञानाशी घातलेली सांगड उलगडते. उत्क्रांतीच्या प्रगत शिडीतही टिकून राहिलेली झुरळे, जनुकीय अभियांत्रिकीतील सजीवांचा शास्त्रशुद्ध अभ्यास, कार्बन - 14ची कामगिरी, बोटॉक्स जीवाणूंवरचे संशोधन, जनुकीय बदल केलेले अन्नघटक इ. विषयांचा समावेश केला आहे. बिबट्यांचा प्रत्यक्षदर्शनाचा अनुभव रोमांचकारक आहे. गणिती कोडी आणि प्रयोगातून विज्ञान जाणून घेणे, हे लेख विज्ञान जिज्ञासा वाढविणारे आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेले प्रयोग आणि संशोधन यातून त्यांची संशोधन वृत्ती व्यक्त होत आहे.

सध्याचा विज्ञान संशोधनाचा अफाट वेग बघता, मूलभूत विषयांवरून नव्याने उदयास आलेल्या उपयोजित विषयांची संख्याही खूपच आहे. त्या विषयांमधील संशोधनाचे निष्कर्ष सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरण अशा सर्व विषयांशी निश्चितपणे जोडले जात आहेत. त्याचबरोबर 21व्या शतकातील माणसाच्या जीवनशैलीशीही त्यांची सांगड घालता येत आहे. त्याची कितीतरी उदाहरणे देता येतील. नमुन्यासाठी काही उदाहरणे पाहू या. एखाद्या व्यक्तीला अल्झायमर ही व्याधी भविष्यकाळात होऊ शकते. यासंबंधीचे अंदाज पाच वर्षे आधी करता येऊ शकतील, असे नवे संशोधन सांगते. तर सर्वत्र जैविक इंधनाला पर्याय शोधण्याचे जगभर जोरदार प्रयत्न चालू आहेत. देशाच्या सीमेचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांना पिझ्झा खावासा वाटतो, पण ताजा पिझ्झा कसा देणार? या प्रश्नावरही अमेरिकेत संशोधन झाले आणि नव्या तंत्रज्ञानाने, तीन वर्षं ताजा आणि चवीचा पिझ्झा टिकविण्याच्या पद्धती शोधण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत.

यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक व माहिती तंत्रज्ञान, संपर्काची साधने आणि माध्यमे, जनुकीय अभियांत्रिकी या क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाने पुढच्या दोन दशकांतच एकूण सजीवसृष्टीवर मोठे बदल घडून यायला सुरुवात होईल, असे संशोधकांचे अंदाज आहेत. पृथ्वीच्या तापमान वाढीचा विचार गांभीर्याने व्हायला हवा. त्यासंबंधी जगभरात विचारमंथन केले जात आहे. म्हणूनच कल्याणकारी विज्ञानाची प्रगती अधिक व्हावी, असेही मत आग्रहाने व्यक्त होत आहे. त्यामुळेच या वर्षीचे, 2018 चे नोबेल पुरस्कार एकूण मानवजातीला भविष्यात उपकारक ठरतील अशाच संशोधनाला दिले गेले आहेत. या सर्व विज्ञान संशोधनाच्या गदारोळात आपली पृथ्वी भविष्यात प्रदूषणाच्या विळख्यात अधिक अडकू नये यासाठी आपण आपल्या जीवनशैलीकडे बारकाईनं लक्ष पुरवणार आहोत का? हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. विज्ञानातील शोधांनी आपल्याला सुखी, समृद्ध, निरामय जगता यावे, अशी आपली इच्छा आहे. पण त्याचबरोबर या पृथ्वीतलावरील नद्या, पर्वत, झाडे - वेली, प्राणी, पक्षी, कीटक अशा जैवविविधतेचाही आपण विचार करतो आहोत का? त्यांच्याच जीवावर माणूस आरूढ झाला आहे, असे वाटावे अशीच परिस्थिती आहे.

सध्या माणसाने विवेकाचे बोट सोडले आहे, त्याने आपली नैतिकता गढूळ केली आहे, हेही एक प्रकारचे प्रदूषणच आहे ना?

हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणीनिसर्गाच्या सान्निध्यात कवीश्रेष्ठ बा. . बोरकरांना झालेला आनंद त्यांनी या गाण्यात व्यक्त केला आहे. हा आनंद मिळवणे, वाढवणे आणि टिकवणे शेवटी आपल्याच हातात असणार आणि ते दिवाळीच्या आनंदात भर घालणारे ठरो, एवढीच अपेक्षा!

ही दिवाळी आमच्या वाचकांना, जाहिरातदारांना, हितचिंतकांना सुखाची, समृद्धीची, आरोग्यपूर्ण जावो!

कविता भालेराव

कार्यकारी संपादक

 

 


Format: Adaptive

Publisher: महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)