40.00 100.00
Download Bookhungama App

सृष्टिज्ञान डिसेंबर २०१ ८ - विविध लेखक

Description:

सृष्टिज्ञान - ध्यास ‘सृष्टिज्ञान’चा, कास विज्ञानाची, आस समृद्धीची !

 विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व

मागच्या आठवड्यात एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ही बातमी होती एका बंगळुरुमधील 16 वर्षांच्या समय गोडिका नावाच्या विद्यार्थ्याच्या यशाची! समय गोडिकानेग्लोबल सायन्स कॉम्पिटिशनमध्ये पहिले पारितोषिक मिळविले. अमेरिकेतील सॅनफ्रान्सिको येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत केवळ तीन मिनिटांची चित्रफित दाखवायची होती आणि या चित्रफितेद्वारे आपले संशोधन सादर करायचे होते. ही गोष्ट अवघड होती. परंतु समयने त्याचे संशोधन फार प्रभावीरित्या सादर केले. त्याच्या संशोधनाचा विषय जीवशास्त्रातीलसिरकाडियन रिदमहा होता. म्हणजे आपल्या शरीरात एक 24 तासांचं घड्याळ किंवा ठराविक लय असते. त्यानुसार शरीराचं काम चालते. या संकल्पनेलासिरकाडियन रिदमअसे म्हणतात.

समय गोडिकाच्या महत्त्वपूर्ण संशोधनाविषयीचा सविस्तर लेख सृष्टिज्ञानमध्ये आम्ही देणार आहोतच. परंतु या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांना विज्ञान विषयांची गोडी लागते. तसेच ते कुतूहलाने विज्ञान संशोधन करण्यात खरोखर आतूर असतात, हेच अधोरेखित होते. त्याचबरोबर त्यांच्या संशोधनाच्या प्रयत्नांना शाबासकीची थाप किंवा प्रोत्साहन मिळाले तर त्यांचा उत्साह वाढून, ते अधिकाधिक प्रयोग करण्यात आनंदाने भाग घेतात.

सध्या शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रमिक पुस्तकांबरोबरच पूरक पुस्तके, संगणक, इंटरनेट, गुगल-सर्च इ. आधुनिक ई-माध्यमांमधून सहजतेने माहिती उपलब्ध होते. तसेच त्यांचे शिक्षकही त्यांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी खूप मेहनत घेतात. उपलब्ध माहितीचा उपयोग करून विज्ञान जिज्ञासेतून अन्न, आरोग्य, दळणवळण, जलद संपर्क इ. विषयांचे काही सामाजिक प्रश्न सोडवू शकू का? असा विचार मुलं-मुली करत आहेत ही गोष्ट नक्कीच आनंददायक आहे.

 

या अंकात आम्ही लखनौला झालेल्या भारतीय विज्ञान महोत्सवाचा वृत्तांत दिला आहे. त्यात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या विज्ञान संशोधन संस्थांमध्ये होत असलेले संशोधन ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मांडले गेले होते.

डिसेंबर महिन्यात जिल्हा पातळीपासून देश पातळीवरील शाळा-महाविद्यालयांमधून विज्ञान प्रदर्शने आणि विज्ञानप्रयोग स्पर्धांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांतून विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या मदतीने वैज्ञानिक संकल्पनांच्या आधारे उत्तम प्रयोग तयार करतात. तसेच उपलब्ध सामुग्रीतून छोटी-मोठी उपयुक्त उपकरणेही बनवितात. वेगवेगळे तक्ते, चित्रे, फोटो, प्रतिकृती, संगणक सादरीकरण यांच्या साहाय्याने वैज्ञानिक सूत्रे, नियम, संकल्पना ठळकपणे, कौशल्याने मांडतात. या सर्व गोष्टींमधून विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान कुतूहल जागे होण्यास नक्कीच मदत होते. त्याचबरोबर काही विद्यार्थी त्यातून प्रेरणा घेऊन स्वतः काही करून बघण्याची धडपड करतात. हे खचितच विज्ञान प्रचार-प्रसार होण्यासाठी साहाय्यभूत आहे.

विविध विज्ञान स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या विज्ञान कल्पकतेचे दर्शन घडते. कितीतरी विद्यार्थी आपल्या अवती भवती निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे सोप्या, सुलभ मार्गाने, संकल्पना वापरून कशी मिळविता येतील, हे या स्पर्धांमध्ये दाखवितात.

शेतीसाठी उपकरणे, पाणी-वीज बचतीची साधने, पाण्याच्या शुद्धतेसाठी नवे, उपयुक्त उपाय, पर्यावरण रक्षण, प्लॅस्टिकला पर्याय, अशी ही विषयांची खूप मोठी यादी होईल. हे प्रयोग करताना फक्त विज्ञान विचारच होतो असे नाही तर त्याचबरोबर प्रयोगासाठी वापरलेले पदार्थ व त्यांची सहज उपलब्धता, प्रयोगाचा एकूण खर्च, त्यानुसार त्याचा होणार प्रसार अशाही बाबींचा नक्कीच विचार केला जातो.

सृष्टिज्ञानमासिक अशा प्रकारचे विद्यार्थ्यांचे प्रकल्प संशोधन प्रकाशित करण्यास नेहमीच प्राधान्य देते. सृष्टिज्ञानने या दिवाळी अंकात (ऑक्टो. -नोव्हें. अंक) दोन विद्यार्थ्यांचे प्रकल्प संशोधन प्रसिद्ध केले आहेत. यातील एक विषय होता घुबडांचे पर्यावरणीय महत्त्व व दुसरा कागद बनवूया घरच्या घरी!

नव्या वर्षासाठी म्हणजे 2019 मध्ये असे प्रयोग- संशोधन प्रसिद्ध करण्यास आम्ही प्राधान्य देणार आहोत. यासाठी विविध शाळांचे पदाधिकारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, प्रयोग मार्गदर्शक या सर्वांचे सृष्टिज्ञानला साहाय्य अपेक्षित आहे.

कविता भालेराव

 

कार्यकारी संपादक


Format: Adaptive

Publisher: महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)