30.00 72.00
Download Bookhungama App

फुलबाज्या - अनुजा बर्वे

Description:

फुलबाज्या - अनुजा बर्वे

आजच्या भारतीय आणि परदेशस्थ भारतीयांचे  बदलते समाजमन, समाजभान, आणि कुटुंबव्यवस्था यावरील अचूक भाष्य तसेच आजच्या झपाट्याने बदलत जाणाऱ्या तंत्र युगाने कळत नकळत संस्कृतीवर होणारा परिणाम याच्या झकास नोंदी या लेखसंग्रहातून अगदी मार्मिकपणे मांडल्या आहेत.प्रस्तावना

अनुजाला वेगळं काहीतरी सुचत असल्याची जाणीव मला आमच्या ओळखी नंतर काही दिवसांतच आली. ही कला तिच्या कीर्तनकार वडिलांकडून तिच्यात रुजली असावी. पुढे मग, सोसायटीच्या वार्षिक सम्मेलनात सहभाग घेताना, तिच्या मंगळागौरीच्या ग्रुप मधे आणि क्वचित प्रसंगी कौटुंबिक कार्यक्रमात तिच्या कौशल्याचा वापर तिने केला आणि शाबासकी व वाहवा मिळवली.

अस्मिताच्या दहावीच्या परीक्षेनंतर आम्ही तिघे अमेरिकेची सफर करून आलो. या अमेरिका  वारीत ’डिस्ने वर्ल्ड’ बरोबर आम्ही आमच्या मित्र / नातेवाईक अश्या चार कुटुंबात राहिलो आणि त्यांच्या बरोबर वेगवेगळ्या स्थळांना भेटी दिल्या. या प्रवासात अनुजाला भावलेली अमेरिका आणि तिथल्या भारतीय कुटुंबांची वेगळी ओळख तिने शब्दबध्द   केली आणि गृहलक्ष्मी प्रवास विशेषांकात ती प्रसिध्द झाली. आपल्या लोकांव्यतिरिक्त इतरांना सुद्धा आपलं लेखन आवडतं याची प्रचिती तिला आली. पुढे काही वर्ष कौटुंबिक अडचणींमुळे विशेष लेखन होऊ शकलं नाही, तरीसुद्धा मधून मधून सुचलेल्या काही कथा / लेख तिने वेगवेगळ्या अंकाना पाठविले. सांगायला अभिमान वाटतो की तिने पाठविलेल्या सर्व लेखांना पसंतीची पावती मिळाली आणि सर्व लेख छापून आले. तिचं एकही लिखाण ‘साभार’ परत आलं नाही. असेच काही निवडक लेख या पुस्तकात घेतले आहेत.

अस्मिताच्या विवाहानंतर आणि थोडसं मानसिक स्थैर्य आल्यावर, अनुजाचा लिखाणाचा वेग अल्पसा वाढला आणि मग काही मार्मिक लेख जसे की” टिकली! एक टिकाऊ बदल !”, “१० मोजून पहा”, “फेसबुक की ई-चाळ” इत्यादी वेगवेगळ्या मासिकांतून छापून आले.

लोकसत्ताच्या ‘चतुरंग’ पुरवणीत ‘कोण आवडे अधिक तुला’ या गाण्यावरच्या लेखाला बऱ्याच थोरामोठ्यांनी मनापासून दाद दिली. ‘महाराष्ट्र टाईम्सच्या एका पुरवणीत छापून आलेल्या “उंदीरमामा ऊर्फ MOUSE!!” या मॉडर्न कथेचं  लोकांनी प्रत्यक्ष भेटीत आणि फोनवरून भरभरून कौतुक केलं.

आज, साठीच्या ‘उंबरठ्यावर’ अनुजाला काय भेट द्यावी हा विचार सतावीत होता कारण आमच्या जिवनातल्या अकल्पित घटनेच्या आघातामुळे कोणत्याही तऱ्हेच्या “Celebrations”चीआमची इच्छाच नव्हती किंवा उमेदही वाटत नव्हती. पण, हे लेखन आणखी काही आप्तस्वकीयांना वाचायला द्यायला हरकत नाही या माझ्या विचारांशी अनुजा सहमत झाली म्हणूनच हे १५ निवडक लेखांचं पुस्तक तिच्या ‘साठीच्या’ निमित्ताने आपल्या हाती देतांना मला अतिशय आनंद होत आहे.

अनुजानं तिचे काही लेख ‘एक बोटी’ (मोबाईलवर ) पूर्ण केलेले मी पहिले आहेत. त्याऐवजी चांगल्या तंत्राचा तिने वापर करावा, विचारांची अखंडता वृद्धिंगत होऊन पुढील काही वर्षात आणखी दहा पुस्तकांचं प्रकाशन करण्या एवढा साठा तिने निर्माण करावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्या उपक्रमासाठी तिला मनापासून शुभेच्छा देतो.

 श्री. निलेश टिकेकरांनी या पुस्तकाची अक्षर जुळणी आणि मांडणी करून दिली. त्यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्या बद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आमचे परम मित्र श्री. अनिल पाध्ये व श्री. अरुण सोहोनी यांनी छपाईच काम आनंदानं स्विकारलं त्या बद्दल मी आणि अनुजा त्यांचे ऋणी आहोत.

 

अविनाश बर्वे. 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि