Default welcome msg!

वेदना – Nafisa Sayyad

तशी खुप भावनिक आहे ही कथा...तरीही शेवटच्या भागात ती निश्चित उंची गाठते.

वेदना – नफिसा सय्यद

त्याने नेहाच्या पुढ्यात पेढा धरला आणि विचारलं, 'बोल, टेस्ट पॉसिटीव्ह येईल ना?'

नेहा सहा वर्षाची, कसली टेस्ट? कशासाठी? काहीही थांगपत्ता नसलेली.

'हो येणार ना बाबा, पॉसिटीव्ह येणार...' नेहा पेढ्याकडे पाहतच बोलली.

बाबा वेगळाच हसला. नेहाला जवळ घेऊन म्हणाला, 'मला मिस करशील?'

‘का बाबा? कुठे जाणार आहे तू?’

‘गेलोच कुठे लांब तर करशील ना मिस?’

‘नाही मीपण येईल ना तुझ्यासोबत.’

‘असं नाही बोलायचं वेडे, तिथं सोबत बिबत नसते कोणाची.’

‘बाबा, मी जाते खेळायला.’

बाबाचं बोलणं कळत नव्हतं नेहाला.

संध्याकाळी टेस्ट रिपोर्ट आले.

पॉझिटीव्ह....थर्ड स्टेज थ्रोट कॅन्सर.

आज लग्नाच्या दिवशी स्वतःला आरश्यात निहाळतांना मला हीच एक वेदना आहे. बाबा असा का बोलला होता? मी आठ वर्षांची असताना बाबा गेला. तेव्हापासून कितीतरी वेळा हा प्रश्न विचारावासा वाटलं मम्मीला पण तिला वाईट वाटेल या एका विचाराने दाबून ठेवला काहूर मनाचा. आज हा प्रश्न पुन्हा उरात घेऊन नाही सोडू शकणार हे घर मी.

मम्मी सगळ्या नातेवाईकांमध्ये बसलेली.

‘मम्मी इथे ये ना’

मी तिला जिन्यात घेऊन गेले.

‘बाबाला काय त्रास होता? त्याला का जगणं नकोस झालं होतं?’

आज नेहा तिला मैत्रिणीसारखीच भासली तिच्याइतकीच उंचीला, समोर उभी असलेली नेहा किती समंजस वाटत होती.

‘तुझी घालमेल कधी लक्षात नाही आली नेहा मला, पण आज बरंच वाटत आहे तुला हा प्रश्न पडला म्हणून. बाबा त्रासात नव्हता ग, तो वेदना जगत राहिला. प्रत्येक हवी असलेली गोष्ट हिरावून घेतली नियतीने. असलेल्या गोष्टीत त्याला सुख शोधताच आलं नाही.’

‘म्हणजे मम्मी? मला नाही कळत आहे तुला काय म्हणायचंय?’

‘आईवर खूप प्रेम होतं ती लवकरच गेली. लग्न झालं बायको खूप सुंदर होती. तिने कधी जमवून नाही घेतलं. तीही गेली सोडून. बहीण सगळ्यात लाडकी होती तीही पळून गेली. मग बाबा दारूच्या ग्लासागणिक दुःख जगात राहिला. जगतोय की मारतोय हेच त्याला उमगत नव्हतं. म्हणून मग मरणाची कारणं शोधू लागला. त्या दिवशी डॉक्टरने सांगितलं, 'I am afraid test will come positive.' लोकं घाबरतात मरणाला, आज डोळे मिटले कि उद्या आपली प्रिय व्यक्ती पाहताच येणार नाही या भीतीला. बाबा ला कारण हवं होतं तो खुश होता. म्हणायचा.

"अब आजमाना हैं मौतको मुझे, के कही ये भी बेवफा तो नहीं..."

‘मग तू आणि मी आपण प्रिय नव्हतो का?’

मम्मी माझे डोळे पुसत म्हणाली.

‘त्याला माहित होतं ग, 'तू मला किती प्रिय आहे. काळजीचा प्रश्नच नव्हता हा. मी ही खुश आहे. त्याची वेदना संपली...’