Default welcome msg!

वल्ली डे-Kaushik Shrotri

हे काहीतरी वेगळं आहे..ह्या कथेतून प्रत्येकाला जे हवे ते काढायचा प्रयत्न करावा लागेल

वल्ली डे – कौशिक श्रोत्री

मध्यरात्रीचे साडेतीन वाजले होते.समस्त वस्त्रनगरी झोपलेली होती.रस्ते निर्मनुष्य झाले होते. तुरळक कुत्र्यांचा व खटाक ... छटाक... असा पॉवरलूमचा आवाज सोडल्यास रस्त्यावर भयाण शांतता पसरलेली होती. घड्याळाचा काटा मुंगीच्या वेगाने पुढे जात होता. एक प्रकारचे गूढ वातावरण पसरले होते. ह्या गूढ वातावरणामध्ये अमावस्येचा चंद्र हळूहळू ही शांतता आणखीन गूढ करत होता. हळूहळू गूढ शांतता शहरावर ताबा मिळवत होती.

अचानक कुत्र्यांचा भुंकण्याचा जोरजोरात आवाज आला आणि ही शांतता लुप्त झाली. Cheetah च्या वेगाने एक Mercedes Benz शहरातल्या रस्त्यावरून सुसाट वेगाने ठाण्याला निघाली होती. मध्यरात्री पसरलेल्या भयाण शांततेचा अक्षरशः चिरफाड करत ही गाडी वस्त्रनगरी इचलकरंजी पार करून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. इचलकरंजीचे सुप्रसिद्ध उद्योजक डी.के आपल्या तरुण ड्राइव्हर बरोबर मुंबईला वकिलाला भेटण्यासाठी निघाले होते. डी.के म्हणजे व्यवसाय आणि प्रयोगशीलता ह्यांचा घनिष्ट उगम होता.

गाडीचा ताबा तरुण ड्राइव्हरकडे होता. मध्यरात्री ३.००ला साहेबांनी फोन करून उठवलं असल्यामुळे तो अर्धा जागा व अर्धा झोपेत होता आणि मनातल्या मनात डी.के साहेबांना मनसोक्त कोल्हापूरी शिव्या घालत होता. मध्यरात्री उठून गाडी चालवण्याची त्याची पहिलीच वेळ होती. सकाळी ४.०० वाजता गाडी शिरोली पार करून कराडच्या दिशेने निघाली होती.

डी.के साहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे ह्रितिक रोशन आणि देव आनंद ह्यांचं अनोखं मिश्रण होतं. ह्रितिक सारखागोरा वर्ण व तगडी शरीरयष्टी, देव आनंद स्टाइल उत्साह, सहा फूट उंची, वय ६०, १९८० काळातला लावलेला चष्मा, अनुभवाने पांढरे झालेले केस, बोक्याची नजर असलेले गूढ डोळे, सतत तणावामुळे गौतम गंभीर झालेला चेहरा ह्यामुळे ड्राइवर डी.के साहेबांशी बोलताना खूप विचार करून बोलत होता.

कोल्हापूर वरून गाडी कराडच्या दिशेने निघाली होती. आजचा प्रवास ड्राइव्हरचा कस पाहणारा होता कारण डी.के साहेबांनी नव्या गाडीच्या gear box आणि engine मध्ये प्रचंड प्रयोग केले असल्यामुळे गियर टाकताना ड्राइवरला दात ओठ खाऊन गियर टाकावा लागत होता. Mercedes वर प्रयोग करणारा हा जगातला पहिला येडा माणूस असे ड्राइव्हर ला वाटत होते. Mercedes Benz वर प्रयोग करणे म्हणजे माधुरी दीक्षित ला सिनेमा सोडून खेळामध्ये करिअर कर असं सांगण्याचा प्रकार होता.

सकाळी ७.३०ला गाडी साताऱ्याजवळ पोहोचली. ड्राइव्हरला प्रचंड भूक लागली होती. त्यात आणखीन एक भर होती ती म्हणजे Mercedes सारखी गाडी असताना देखील A.C अजिबात नं लावता त्याच्या साहेबांनी त्याला गाडीच्या काचा उघड्या ठेवण्यास सांगितले होते आणि गाडीमध्ये टेप असताना देखील तो बंद ठेवून साहेब त्यांच्याकडे असलेल्या रेडियो मधून गाणी ऐकत होते.

त्याचे साहेब सतत धूम्रपान करत असल्यामुळे ड्राइव्हरला बाहेरच्या हवेचा कमी आणि गाडीत असलेल्या सिगारेटच्या धुरामुळे जास्त त्रास होत होता. हा प्रवास ड्राइव्हरचा अंत पाहणार होता. त्याने गाडी थांबवू का असे विचारल्यावर त्याच्या साहेबांनी त्याला हातानेच गाडी न थांबवण्याचा इशारा दिला. ड्राइव्हरला प्रचंड राग आला कारण त्याचे साहेब त्याला बऱ्याचदा हातानेच इशारा देत असत व स्वतः ड्राइव्हरशी खूप कमी बोलत असत.

सकाळी ७.५० ला डी.के साहेबांनी सातारा शहरामध्ये एका सुप्रसिद्ध हॉटेल मध्ये ड्राइव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले. दोघांनी गाडीमधून उतरून फ्रेश होऊन सकाळच्या नाष्ट्याची ऑर्डर दिली. ड्राइवरनं इडली सांबर व चहा मागवला व साहेबांनी डोसा मागवला.डोसा व इडली संपवून दोघे निघणार एवढ्यात डी.के साहेबांना कॉफी प्यायची हुक्की आली व पुढचा प्रसंग पाहून ड्राइव्हर पुरता वेडा झाला. डी.के साहेबांनी वेटरला २४ वेळा कॉफी आणण्यास सांगितली. डी.के एक कप कॉफी पिणार आणि परत वेटरला बोलवून परत कॉफीची ऑर्डर देणार हा क्रम २४ वेळा चालू होता. हॉटेलचा मालक डोळे विस्फारून हे सर्व पाहत होता. ड्राइव्हर देखील पूर्ण वेडा होऊन हे दृश्य पाहत होता. वेटर ने २४ वेळा स्वयंपाघरात जाऊन डी.के. साहेबांना कॉफी दिली होती आणि त्यांनी कॉफी २४ वेळा प्राशन केली होती. २४ वेळा स्वयंपाघरात जाऊन वेटर देखील अर्धवेडा होत होता व त्याच्याकडे पाहून डी.के निर्विकार होते.

अखेर नाष्टा करून पुढच्या प्रवासासाठी दोघे निघाले. सकाळचे बरोबर १०.०० वाजले होते आणि गाडी नुकतीच पुण्यात प्रवेश करत होती. वकिलाने दुपारी १२. ४५ वाजता बोलावले होते. किंचितही उसंत न घेता गाडी मुंबईच्या दिशेने निघाली. बरोबर १२. ३० ला वकिलांच्या ठाण्याच्या घराजवळ गाडी थांबली व ड्राइव्हरने सुस्कारा सोडला. ड्राइव्हर गाडीचा दरवाजा उघडणार एवढ्यात, डी.के. साहेब म्हणाले “अरे... मी महत्वाची फाईल घरीच विसरलो. आपण परत इचलकरंजीला घरी जाऊ...फाईल घेऊन आपण परत येऊ. मी वकील साहेबांना तसं कळवतो”

गर्ल फ्रेंडशी ब्रेकअप झाल्यावर जेवढी चीड येत नाही तेवढ्या दुपटीने चीड ड्राइव्हरला आली होती. ड्राइव्हर प्रचंड चिडला होता. त्याच्या मनात आलं हा सुप्रसिद्ध उद्योगपती साधी फाईल आणू शकत नाही...नोकरीत हाथ बांधील असल्यामुळे तो काहीच बोलू शकत नव्हता .

गाडीच्या शेजारी त्याला मोठा दगड दिसला .

पण ...

मनातल्या मनात तो विचार करत होता...

तो दगड .... आणि ... डी.के साहेब...प्रयोग केलेली Mercedes benz..आणि मी...