Default welcome msg!

टिक टॉक - Megha Deshpande

एखाद्या कवितेत कथेचा आत्मा सापडतो तेंव्हा खूप गंमत येते....मला खूप भावते ते.

टिक टॉक - मेघा देशपांडे

टिक टॉक टिक टॉक एक वेडा रस्त्यालगत चादर छातीशी कवटाळुन झोपायसाठी सावली शोधत

एक मूल सिग्नलवर दिलवाले फुगे विकत उन्हा तान्हात आणखीन रापत

एक भिकारी त्या तिथूनच जखम दाखवत भीक मागत रोज नव्याने पुण्य विकत

एक जीव पायात घुटमळत पदपथावर भटकत आई पाणी अन्न शोधत

एक वार्धक्य गोंधळलेले गर्दी ओसरायची वाट बघत दिशा मार्ग माणसं चाचपत

एक गर्दी धापा टाकत स्पर्धेत धावत जीव वाचवत गहाण टाकत आठ तेरात पाच बारात टिक टॉक टिक टॉक रुक्ष यांत्रिक एकल एकट भीतीदायक रत रत अजून अजून गच्च होत न वितळणारे कोष जपत जवळ जवळ हरवत हरवत टिक टॉक टिक टॉक

एक वर्तुळ एक प्रतल एकाच वेळी सारं काही 'माझ्या' पुरता माझ्या परिघात घर स्वप्न भूक भागवत

सुरूच आहे सुरूच आहे शहरी घड्याळ टिक टॉक टिक टॉक काळचक्राच्या टाईमबॉम्ब वर निरागस धुंद आक्रसत आत्ममग्न अनोळखी क्रूर होत टिक टॉक टिक टॉक टिक टॉक