40.00 100.00
Download Bookhungama App

सृष्टिज्ञान जून २०१ ८ - विविध लेखक

Description:

सृष्टिज्ञान

ध्यास ‘सृष्टिज्ञान’चा, कास विज्ञानाची, आस समृद्धीची !

 संपादकीय

जागतिक पर्यावरण दिन : 5 जून 2018

केरळमधील कोळीबांधवाचा एक गट समुद्रातून मासे पकडतानाच, जाळ्यात अडकून येणारा समुद्रातील प्लॅस्टिक कचराही गोळा करत आहे. हे काम ते गेली काही महिने अत्यंत कसोशीने करत आहेत. पूर्वी जाळ्यात अडकलेला प्लॅस्टिक कचरा ते तसाच पुन्हा समुद्रात टाकत. परंतु आता मात्र समुद्र पर्यावरणाला हानी पोहचविणारे प्लॅस्टिक किनाऱ्यावर गोळा केले जाते व मशिनच्या साहाय्याने बारीक चुरा करून, रस्ता बांधणीसाठी ते वापरले जात आहे. आत्तापर्यंत या कोळी बांधवांनी सुमारे 10 टन प्लॅस्टिक पिशव्या व बाटल्या आणि 15 टन मासे पकडायची फाटलेली प्लॅस्टिक जाळी आणि दोर व इतर प्लॅस्टिक वस्तू समुद्रातून बाहेर काढल्या आहेत. 

वरील माहिती ही या वर्षीच्या - 5 जून 2018 च्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अतिशय दखल घेण्याजोगी व कौतुकास्पद आहे. याचे कारण या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताला दिले गेले आहे. ‘प्लॅस्टिक प्रदूषणावर मात’ अशीच यावेळची या दिनासाठी मध्यवर्ती कल्पना आहे. एकदाच वापरून, फेकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध मोठ्या निर्धाराने प्रतिकार करून समाजाच्या सर्व स्तरावर जागृती करण्यासाठी या दिवसाचे निमित्त साधून सर्व जग एकत्रित येणार आहे. 

जगभरातल्या सागरी जैवविविधतेला आणि माणसाच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकला कायमस्वरूपी पर्याय शोधावा. प्लॅस्टिक निर्मितीचा आणि वापराचा अतिरेक या दोन गोष्टींसाठी जगभरातील शासनव्यस्था, उद्योगधंदे आणि प्रत्येक व्यक्तीने त्यासाठी एकत्र येऊन, तातडीने उपाययोजना कराव्यात असे आवाहन भारताचे पर्यावरण जंगल आणि हवामानबदल मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण प्रमुखांनी केले आहे. 

प्रत्येकाने रोज पर्यावरण संरक्षणासाठी एक साधी गोष्ट जरी, सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने केली तर या पृथ्वीग्रहावर दररोज कितीतरी कोटी पर्यावरणपूरक गोष्टी घडू शकतात. त्यासाठी इच्छाशक्ती मात्र हवी. इतर देशांच्या मानाने भारताने प्लॅस्टिक पुनर्वापरासंदर्भात खूपच आघाडी मारली आहे. त्यामुळे त्याबाबतीत, इतरांनी भारताचा आदर्श ठेवावा, अशी परिस्थिती नक्कीच भविष्यात येईल. 2018 च्या पर्यावरण दिनाचे यजमानपद या दृष्टीनेही प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीचे असेल. 

आपल्या धरणीमातेसाठी प्रत्येकाने या दिवशी काही ना काही पर्यावरणपूरक कृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आणि म्हणूनच हा ‘लोकांचा दिवस’ मानला जातो. प्लॅस्टिक प्रदूषणाकडे जगातील पर्यावरण संवर्धक - संरक्षकांना गांभीर्य का जाणवत आहे ? याची कारणे खालील आकडेवारीतून समजतात. 

1) दरवर्षी 500 दशलक्ष प्लॅस्टिकच्या पिशव्या जगभर वापरल्या जातात. 

2) प्रत्येक वर्षी 8 दशलक्ष प्लॅस्टिक कचरा समुद्रात टाकला जातो आहे. 

3) मागच्या 100 वर्षात जेवढे प्लॅस्टिक निर्माण केले गेले त्यापेक्षा अधिक प्लॅस्टिकची विविध रूपात मागच्या 10 वर्षात निर्मिती झाली. 

4) 50% प्लॅस्टिकच्या गोष्टी आपण एकदाच वापरतो व फेकून देतो. 

5) प्रत्येक मिनिटाला जगभरात एक दशलक्ष प्लॅस्टिकच्या बाटल्या विकत घेतल्या जातात. 

6) आपण निर्माण करत असलेल्या एकूण विविध प्रकारतील बराच मोठा कचरा केवळ प्लॅस्टिकचा आहे, जो विघटन होऊ शकत नाही. 

अशा पद्धतीने अमर्याद वापर होत असलेल्या प्लॅस्टिकच्या विरुद्ध जनमानसात कायमची जागृती करण्यासाठी, या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची निवड झाली आहे. त्यात प्रत्येकाचा सहभाग मोलाचा आहे. लिखित माध्यमातून एकूणच विज्ञान प्रसार आणि प्रचार करणाऱ्या ‘सृष्टिज्ञान’ने जूनच्या अंकात पर्यावरण आणि त्या संबंधित विषयांना विशेष स्थान दिले आहे. 

कविता भालेराव 

कार्यकारी संपादक


Format: Adaptive

Publisher: महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)