80 200
Download Bookhungama App

राम राम - Dr. Ramdas Mahajan

Description:

‘राम-राम’ हा शब्द आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. परिचित अथवा अपरिचित कोणीही व्यक्ती भेटल्यावर राम-राम हाच शब्द प्रथम उच्चारला जात असे. खेडेगावात काही प्रमाणात ही प्रथा अजूनही जिवंत आहे. प्रवासात भेटणाऱ्या व्यक्ती, घटना, आसपासचा परिसर यांमुळे आपले अनुभव विश्व समृद्ध होते. माझे लिखाण हे प्रवास वर्णन नसून अनुभव कथन आहे, आपण त्याच दृष्टीकोनातून ते वाचून लिखाणाचा आनंद लुटावा.

 डॉ. रामदास महाजन यांच्या ‘राम राम’ या पुस्तकाला छोटेखानी प्रस्तावना लिहिताना मला विशेष आनंद होत आहे कारण सुमारे ५ वर्षांपूर्वी त्यांची – माझी ओळख झाली तीही एका पुस्तकाच्या निमित्ताने! डॉक्टरांना स्वतःला वाचनाची आवड आहे एव्हढेच नव्हे तर आपल्याला आवडलेल्या पुस्तकाच्या लेखकाला प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी स्नेहसंबंध जुळवूनच नव्हे तर टिकवून ठेवण्याची दुर्मिळ कला त्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. माझे ‘चक्रव्यूह शेअरबाजाराचा, मार्गदर्शन गुंतवणूक गुरूंचे’ हे पुस्तक वाचून ते मला भेटायला आले व माझे मित्रच होऊन गेले!

डॉ. रामदास महाजन हे शिक्षणाने आयुर्वेदिक डॉक्टर असून कोकणातील दापोली तालुक्यातील कोळथरे या समुद्रकिनारी वसलेल्या छोट्याशा निसर्गरम्य खेड्यात त्यांचे बालपण गेले. तेथेच असलेल्या ‘आगोम’ या फॅमिली बिझनेसची धुरा महाजन कुटुंबीय गेली अनेक दशके सांभाळीत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी ५ वर्षांपूर्वी ते पुण्यात वास्तव्यास आले असले तरी त्यांचा एक पाय नेहमी कोळथरे मध्ये असतो. याच गावातील पशु-पक्षी व झाडे-वेलींमध्ये रमलेला हा माणूस. जखमी अथवा असहाय्य परिस्थितीत सापडलेल्या प्राण्या-पक्ष्यांना आपल्या ‘अनाथालया’मध्ये आणून त्यांना बरे अथवा मोठे करून त्यांना परत एकदा निसर्गात सोडणे हा त्यांचा छंदच आहे; मग ते कासव असो, माकड असो, साळू असो अथवा समुद्री गरुड! असे अनेक किस्से, फोटोंसहित, वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.

डॉक्टरांचा दुसरा छंद म्हणजे भारतभर निरनिराळ्या निसर्गरम्य स्थळांवर मनसोक्त सायकलवरून भटकंती! त्यासाठी एखादी सम-विचारी मित्रांची टीम तयार करायची, प्रवासाचे व्यवस्थित नियोजन करायचे, योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यायचे, सायकली मोटारीत अथवा रेल्वेत चढवायच्या आणि इप्सित स्थळी सायकली व टीम पोहोचल्यानंतर मग काय – “चालवत राहा, चरत रहा व जगत रहा.” दिवसाला १००-१५० कि. मी. ची रपेट करीत, येणाऱ्या परिस्थितीला आनंदाने सामोरे जात, वाटेत भेटणाऱ्या विविध व्यक्तींशी गप्पा मारत आपले ‘लक्ष्य’ पुरे करायचे. अशाच प्रकारे त्यांनी सज्जनगड, पंढरपूर, उटी, जैसलमेर, मेघालय इ. ट्रेक्स यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. या सर्व ‘सायकल ट्रेक्स’चे त्यांचे अनुभव कथन ‘राम राम’ या त्यांच्या पुस्तकातून रसिकांना वाचायला मिळणार आहे. त्यांनी वर्णन केलेली ‘मनाली-लेह-खार्दुंग’ या दुर्गम भागातील ‘सायकल ट्रीप’ खरोखरच तरुण निसर्गप्रेमींना मार्गदर्शक ठरावी. सायकल चालवता-चालवता “सायकल चालवा – निसर्ग वाचवा” हा संदेश सर्वांना देण्यास ते विसरत नाहीत.

‘सायकल’ ही डॉक्टरांची ‘सवत’ तर नॅनो ही त्यांची ‘पॅशन’! टाटांनी बनविलेल्या ‘नॅनो’ बद्दल त्यांना खूपच आकर्षण व अभिमानही आहे. नॅनोला लोकांनी ठेवलेल्या नावांमुळे ते अस्वस्थ झाले व “कोळथरे ते काश्मिर” ही सुमारे ५,५०० कि. मी. अंतराची ‘महासफर’ कोणतेही विघ्न न येता पार पाडली! या महासफरीसाठी त्यांना प्रत्यक्ष रतन टाटांचे आशीर्वाद मिळाले. रोज ५००-६०० कि. मी. ची रपेट मारीत, ४॰C पासून ४६॰C तापमानाचा सामना करीत, ७ राज्यांतून प्रवास करीत कोळथरे - सोनमर्ग - कोळथरे हा अवघड प्रवास त्यांनी पार पाडला. ही साहसकथाही वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळणार आहे.

या निसर्गवेड्या सायकलवीराला माझा मनाचा “राम-राम”.

 

अतुल सुळे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि