Id SKU Name Cover Mp3
मुक्तक


60 116
Download Bookhungama App

मुक्तक - अभिजित थिटे

Description:

आपलं जगणं सुंदर आहे. इथली प्रत्येक गोष्ट ताला-सुरांत आहे. कधीकधी आपल्याला समेवर येता येत नाही आणि गडबड होते. एकदा तो कणसूर सापडला, की सारं काही अतिशय सुंदर होऊन जातं. मुक्तक या कविता संग्रहातील कविता वाचताना नेमकी हीच अनुभूती मिळत रहाते. प्रस्तावना मी लिहिलेल्या या शब्दांना कविता म्हणावं, की मुक्तपणे व्यक्त केलेलं स्वगत? खरं तर कळलेलं नाही मलाही अजून. ज्या ज्या वेळी, जे जे वाटलं, ते मनात उमटलेल्या भाषेत नोंदवून ठेवलं इतकंच. सारं काही निवांत, मजेत चाललेलं असताना मधेच कधीतरी हुरहूर वाटते, मधेच कधीतरी खूप बोलावंसं वाटतं, तर कधीतरी उगाचच हुंदकाही दाटून येतो. हे का होतं, ते समजत नाही. ‘अरे प्रेमभंग तरी किती झाले तुझे?’ असं एखादा मित्र विचारूनही जातो चटकन. तेव्हाही हसू येतं. आपल्या एखाद्या प्रकटीकरणावर एखाद्याची अशीही प्रतिक्रिया असू शकते, ही गोष्टही गंमतशीर वाटते. व्यवसायाच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं फिरणं होतं, तेव्हा डोळे उघडे ठेवले, मन जागं ठेवलं की कितीतरी गोष्टी हाताला लागतात. यामध्ये कुंभमेळ्याविषयी मला जे काही वाटलं, तेही आहे. लाखो लोक तिथं, त्या दिवशी त्रिवेणी संगमावर अंघोळ करायला का जमत असतील, त्या एवढ्या गर्दीतून, त्या गर्दीमुळे निर्माण होणार्‍या अस्वच्छतेतून ते नक्की काय मिळवत असतील, या प्रश्‍नांची उत्तरं सापडत गेली त्या कुंभमेळ्यातच. मग लक्षात आलं, आपल्याला बाहेरून जे काही वाटतं, ते तसं असायलाच हवं हा काही नियम नाही. उलट प्रत्यक्ष आणि अनुमान यांत फरक असतोच. कुंभमेळ्याच्या दिवसांत जे जे उमटत गेलं, ते ते रोजच्या रोज नोंदवत गेलो आणि साकारली एक मालिकाच. त्यावर आधारित एक शॉर्ट फिल्मही झाली आणि ती देश-परदेशांत गाजलीही. भारतीय मानसिकतेतून, साधू, त्यांच्या अंघोळी, त्यांच्या इतरांना पाहाव्याशा वाटणार्‍या लीला यांपैकी काहीही नसून, ती पाहिली गेली. कदाचित त्यातला दृष्टिकोन भावला असावा. कधी कृष्ण, कधी ज्ञानदेव, कधी अश्‍वत्थामा, कधी अहिल्या, सीता आणि ऊर्मिला भेटत राहिल्या या प्रवासात. कधीतरी त्यांना समजून घ्यावंसं वाटलं. आपल्या नेहमीच्या व्यावहारिक वागण्यापलीकडे जाऊन काहीतरी शोधू पाहावंसं वाटलं. सगळीकडे डोकावून पाहण्याची संधीही मिळत गेली. तेवढा अवकाश मिळाला. इथे मांडलाय तोच विचार. माझ्या चिंतनाचं वगैरे ते फलित आहे, असा माझा दावा अजिबात नाही. उलट त्या त्या गोष्टी पाहिल्यावर, त्यांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करताना जे काही मनात आलं, ते नोंदवलं, इतकंच. ते माझ्या मनाचं प्रकटन आहे. प्रत्येकाच्या मनाचं तसंच असावं, असा माझाही आग्रह नाही. फक्त जे आहे ते माझं आहे, एवढंच स’जून घेतलं तरी पुरे. प्रेम! आपल्या प्रत्येकाच्या मनातली कधी छुपी, तर कधी उघड भावना. दोघांचं एकमेकांच्या प्रेमात पडणं, एकमेकांचं होऊन जाणं हे खूप सुंदर असतं. तरल असतं. कधीकधी काहीतरी चुकतं आणि काय’साठी एकमेकांचं होण्याच्या आणाभाका घेणारे ते नाही देऊ शकत साथ एकमेकांना आयुष्यभर. अशा वेळी आपल्या मनातली ती भावना कुठेतरी दूर ठेवून जगत राहणं ही आणखी वेगळी गोष्ट. कधीतरी कुठेतरी असं काहीतरी दिसलं, भेटलं, जाणवलं आणि तेही नोंदलं गेलं. ‘दर्दभरी गाणी जास्त चालतात बघ,’ असं एक मित्र बोलून गेला. तेव्हा हसू आलं. नंतर हेही जाणवलं, हो. खरंय त्याचं. प्रत्येकाच्या मनात एक अश्‍वत्थामा दडलेला असतो. सतत अस्वस्थ असणारा. कोणती तरी अनाम जखम सोबत घेऊन फिरत राहणारा. ही प्रेमाची तरलता मग उतरत गेली वेळोवेळी. कधी भांडणं, कधी अबोला, कधी एकमेकांचं होऊन जाणं उमटत राहिलं मनात. तेही नोंदवलं त्या त्या वेळी. आपलं जगणं सुंदर आहे. इथली प्रत्येक गोष्ट ताला-सुरांत आहे. कधीकधी आपल्याला समेवर येता येत नाही आणि गडबड होते. एकदा तो कणसूर सापडला, की सारं काही अतिशय सुंदर होऊन जातं, हा साक्षात्कार असाच कधीतरी झाला होता. त्यानंतर पडणारा प्रत्येक पाऊस अधिक देखणा होत गेला. वारी अशीच सापडली. इतकी माणसं एका वेळी पालख्या मिरवत इतकं लांब चालत का बरं जात असतील, हा प्रश्‍न होता मनात. त्याचं उत्तर सापडलं वारीतच. तिथंच भेटले ज्ञानोबा आणि तुकोबा. प्रत्येक वारकर्‍यात असलेले. तेव्हाही मला जे काही वाटलं, मनात जे उमटलं, ते नोंदवून ठेवलं.बाकी अधिक काय सांगावं. जे आहे ते समोर आहे. माझं वाटणं तुम्हाला पटलं किंवा अजिबात पटलं नाही, तरी हरकत नाही. एकदा ते पाहिलंत, किमान माझं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केलात, हेही पुरेसं आहे. पुढच्या पानांतून मीच अखंड बोलणार आहे. तेव्हा आता इथे अर्धविराम घेतो. तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. - अभिजित धनंजय थिटे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि