250 499
Download Bookhungama App

दुर्दैवी पंचतारका -

Description:बाबुराव अर्नाळकर यांच्या प्रसिद्ध कादंबरी नायक काळापहाडची अजून एक रहस्यमय कादंबरी. ऑडिओबुक स्वरूपात.

कथासूत्र! साऱ्या त्रिभुवनात ज्यांना तोड नाही असे पाच तारकाकृति हिरे नेपाळच्या राजघराण्याच्या प्राचीन रत्नसंग्रहात होते अणि राजशेखरने सूरजलाल बक्षीच्या सहाय्याने ते त्या रत्नसंग्रहातून पळवून मुंबईत आणले होते. राजशेखरला ते हिरे विकावयाचे होते. त्याने चंद्रवदनाचा लौकिक ऐकला होता आणि ते हिरे चंद्रवदनालाच विकण्याचे ठरविले होते. प्रवासी क्लबमध्ये तो व्यवहार पुरा करण्यासाठी चंद्रवदन आणि राजशेखर यांची भेट होणार होती. ठरलेल्या वेळी वृद्ध राजशेखर चंद्रवदनाला भेटावयासहि आला होता. पण तो टॅक्सीतून उतरून प्रवासी क्लबमध्ये शिरण्यासाठी रस्ता ओलांडीत असताना एका भरवेगाने धावणाऱ्या मोटारीखाली सापडून ठार झाला होता आणि त्याच्याजवळची छोटी बॅग नाहीशी झाली होती. चंद्रवदनाला ते समजताच भलताच धक्का बसला होता. राजशेखर त्याला भेटावयास येत असतानाच त्याची अशा प्रकारे हत्या करण्यात आली होती. तेव्हा त्या प्रकाराची जबाबदारी आपलीच आहे असे तो मानीत होता. राजशेखरची एकुलती एक मुलगी मेघमाला ही सुद्धा आपल्या वडिलांच्या मृत्यूला चंद्रवदनच जबाबदार आहे असे मानीत होती. चंद्रवदनाला सूरजलाल बक्षीचा उजवा हात मंछूराम याने जवळजवळ कैद करूनच बक्षीच्या वरळी येथील गुप्त ठिकाणी नेले होते. तेथे गेल्यानंतर बक्षीनेच राजशेखरचा त्या पाच हिऱ्यांसाठी खून केला होता आणि खून करूनही त्याला अस्सल हिऱ्यांऐवजी नकली हिरे मिळाले होते असे चंद्रवदनाला समजले होते. राजशेखर चंद्रवदनाला हिरे विकण्यासाठी प्रवासी क्लबकडे जात असताना वाटेत त्याच्या बॅगेतील अस्सल हिरे कुणी काढून घेतले हा एक मोठा प्रश्नच होता. पण चंद्रवदनाला त्यासबंधी विचार करण्यास वेळच मिळाला नव्हता. कारण सूरजलालने त्याला त्या घरात कैद करून ठेवले होते. चंद्रवदनाने पोलिसांना मदत न करता आपल्या पक्षाला मिळावे नाही तर मरावे अशी अट बक्षीने त्याला घातली होती. बक्षीची प्रेयसी वैशाखी हिने चंद्रवदनाच्या सौंदर्यावर भाळून त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला होता. पण बक्षी अचानक तिथे आल्यामुळे तो प्रयत्न फसला होता आणि त्यावेळी झालेल्या गडबडीचा फायदा घेऊन चंद्रवदन तेथून निसटला होता. चंद्रवदन उर्फ काळापहाड याचा मित्र घेला हा चोरीचा माल विकत घेण्याचा धंदा करीत असे. त्याने बजाबहाद्दर नावाचा माणसाने पंचतारकांपैकी एक अस्सल हिरा आपणाकडे विकावयास आणला आहे अशी माहिती चंद्रवदनाला दिली आणि चंद्रवदनाने तो हिरा घेलाकडून ऐंशी हजाराला विकत घेतला व नंतर ते ऐंशी हजारही त्याने चातुर्याने वसूल केले आणि तो हिरा यादवरावांच्या स्वाधीन केला. पोलीस कमिशनरांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ते स्वतः महिपतरावांना बरोबर घेऊन चंद्रवदनाच्या घरी आले आणि या भानगडीत जर काळापहाड पडला तर त्याला अटक करण्यात येईल अशी धमकी दिली. चंद्रवदन हाच काळापहाड आहे अशी महिपतरावांची खात्री होती आणि साहेबांना तसा संशय होता. चंद्रवदनाने त्या प्रकरणात भाग घेऊ नये अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्याला तशी धमकी दिली होती. पण राजशेखरच्या मृत्यूची जबाबदारी आपणावर आहे असे चंद्रवदन मानीत होता आणि तो त्या प्रकरणातून माघार घेण्यास तयार नव्हता. कमिशनवर आणि महिपतराव चंद्रवदनाच्या घरी येण्यापूर्वी तेथे मेघमालेचा प्रियकर विश्वजीत देशमुख आला होता आणि तो साहेबांच्या दृष्टीस पडू नये ह्या हेतूने चंद्रवदनाने त्याला बेशुद्ध करून आपल्या झोपण्याच्या खोलीत ठेवले होते आणि तो कोणत्याही वेळी क्लोरोफॉर्मच्या गुंगीतून सावध होईल अशी भीती असल्यामुळे कमिशनर तेथून कधी बाहेर जातात असे चंद्रवदनला झाले होते. साहेब उडून दाराजवळ गेले. त्यांनी ते थोडेसे उघडले. नंतर ते थांबले आणि मागे वळून म्हणाले, ‘चंद्रवदन तुला जर विश्वजीत किंवा ती मुलगी यांच्याकडून काही समजले तर ते तू मला ताबडतोब कळवायला हवे.’


Format:

Publisher: